Sunday, 31 December 2017

विद्युतमानसोपचार: पहिली पायरी 

विद्युतमानसोपचाराच्या प्रवासातला पहिला मान जातो तो इन्शुलिन ला. हो, इन्शुलिन म्हणजे मधुमेहाच्या उपचारासाठी आपण सगळे वापरतो तेच. इन्शुलिन घेणार्या सर्व रुग्णांना त्यांचे डॉक्टर हायपोग्लायसिमिया (रक्तातील साखर कमी होणे) या धोक्याबद्दल सांगत असतात. तो धोका म्हणजे, साखर खूप कमी झाली, तर फिट येऊ शकते, किंवा कोमा अवस्था निर्माण होऊ शकते. याच तत्वाचा वापर प्रथम झाला मानसोपचार क्षेत्रात. 

इन्शुलिन वेगळं काढण्यात यश मिळालं 1920 साली. १९२६ मध्ये, इन्शुलिन च्या थोड्या जास्त डोसने झोप येते व खूप जास्त डोस ने कोमा अवस्था येते हे लक्षात आलं. याच गुणाचा वापर करुन, १९२७ साली इन्शुलिन वापरलं जायला लागलं, अफू चा उतारा करण्यासाठी (Narcotic Withdrawal/Opioid Withdrawal) साठी. अफूच्या उतार्यामध्ये, रुग्णाला खूप बेचैनी होते, झोप येत नाही, अंग कापतं, तल्लफ लागते. या सर्व लक्षणांवर इन्शुलिन ने बर्याच प्रमाणावर कंट्रोल आणला. तेव्हा असं लक्षात आलं, की इन्शुलिन आणि मेंदू यांचं काही तरी नातं आहे.
 १९२७ साली, मॅनफ्रेड सेकल याने एक पाऊल पुढे जाऊन असा विचार केला, की जर इन्शुलिन ने अफू उतार्यामधली बेचैनी आणि निद्रानाश थांबतो, तर ज्या रुग्णांना Anxiety Disorders, Sleep disorders आहेत, त्यांच्यामध्ये इन्शुलिन वापरलं तर काय होईल? या विचाराने त्याने त्या रुग्णांच्यावर प्रयोग करायला सुरुवात केली. सब-कोमा डोस इन्शुलिन (इन्शुलिनचा असा डोस, की ज्यामुळे झोप येईल, पण कोमा नाही) अशा रुग्णांना दिल्यावर त्यांच्यामध्ये आश्चर्यकारक फरक पडला. व ही उपचार पद्धती जोर धरु लागली. 

एक पाऊल पुढे जाउन, सेकल ने काही स्कीझोफ्रेनियाच्या रुग्णांवर तोच प्रयोग केला व त्यांच्यात थोडी सुधारणा झाली. काही रुग्णांना इन्शुलिनचा डोस देताना मात्र, सेकल चा अंदाज चुकला आणि त्याने इन्शुलिनचा खूप जास्त डोस रुग्णांना दिला. अशा रुग्णांची साखर खूपच कमी झाली, त्यांना फिट्स आल्या, व काही कोमा मध्ये सुद्धा गेले. ग्लुकोज चं इजेक्शन हा यावर रामबाण इलाज केल्यावर, ते सगळे शुद्धीवर आले, पण इथे गंमत झाली. स्किझोफ्रेनियाचे ज्या रुग्णांना फिट्स आल्या, त्या रुग्णांमध्ये, फिट्स न आलेल्या रुग्णांपेक्षा काही पटीने जास्त सुधारणा झाली होती. त्यांची शरीरक्रिया, झोप, वाणी, भूक या सर्व गोष्टी पूर्वीच्या काही पटीने सुधारल्या व त्यामुळे हे लक्षात आलं, की ही वाढीव सुधारणा मेंदूत फिट आल्यामुळे झालेली आहे. स्किझोफ्रेनिया या गंभीर व दीर्घकालीन आजारावर उपचार होऊ शकतो हे दाखवणारी ही इतिहासातील पहिली घटना होती!

हे सगळं जर्मनीत सुरु असताना, शेजारच्या हंगेरीमध्ये तशाच घटना घडत होत्या. लॅडिस्लॉस व्हॉन मेडुना हा हंगेरीमधला एक न्य़ूरॉलॉजिस्ट (ज्याला आज न्य़ूरोफिजिशियन म्हणतात). त्याच्या प्रॅक्टिसमध्ये, त्याला एक गोष्ट जाणवली, की त्याच्याकडे येणार्या फिट्स चा आजार असणार्या पेशंट्स ना स्कीझोफ्रेनिया/बायपोलर आजार असण्याचं प्रमाण नगण्य होतं. त्याच्याकडे येणार्या, ज्या एपिलेप्सीच्या रुग्णांना स्किझोफ्रेनिया हा आजार होता, त्यांच्यात एपिलेप्सीची फिट आल्यावर काही काळ स्किझोफ्रेनियाच्या लक्षणांमध्ये सुधारणा व्हायची हेही त्यानं पाहिलं होतं.  हे डोक्यात घेऊन, मृत झालेल्या एपिलेप्सी व स्कीझोफ्रेनिया पेशंट्चं जेव्हा त्यानं शवविच्छेदन (Post-Mortem) केलं, तेव्हा त्याला एपिलेप्सी व स्कीझोफ्रेनियाच्या पेशंट्सच्या मेंदू मध्ये मोठा फरक आढळला. एपिलेप्सी असणारा मेंदूमध्ये पेशींचा हायपरप्लेसिया (भाऊगर्दी) होती, तर स्कीझोफ्रेनियाच्या मेंदू मध्ये पेशींचा शुकशुकाट होता. तेव्हा मेडुना ने “फिट्स आणि स्कीझोफ्रेनिया हे एकमेकांचे जैविक वैरी (Biological Antagonists) आहेत” असा सिद्धांत मांडला.  त्याच्या दैनंदिनीमध्ये तो लिहितो, 
     
“आजच्या घडीला, स्कीझोफ्रेनिया पूर्णपणे बरा करण्याचा मी विचारसुदधा करु शकत नाही, कारण आपल्या आत्ताच्या ज्ञानानुसार स्किझोफ्रेनिया हा अनुवांशिक आजार आहे. त्यामुळे, त्या रुग्णाचं व त्या आजाराचं भवितव्य रुग्णाच्या जन्मासोबतच लिहिलं गेलं आहे. हा आजार त्याच्या गर्भाच्या बीजाशी जोडला गेला आहे, व ही वस्तुस्थिती काही करुन बदलणार नाही.”

हे मेडुनाचं मत पुढील ३-४ वर्षात बदललं, व त्यानं आपल्या सिद्धांतावर संशोधन करायचं ठरवलं. १९३४ साली, त्याला दीर्घकालीन स्कीझोफ्रेनिया असणार्या व कॅटॅटोनियामध्ये गेलेल्या (स्किझोफ्रेनियाची अत्यंत गंभीर अवस्था) व ४ वर्षं अंथरुणावर पडून असणार्या एक रुग्ण भेटला, ज्यावर हा प्रयोग करायचं ठरलं. फिट येण्यासाठी त्याला कॅंफरच्या तेलाचं इंजेक्शन दिलं (अजून ECT चा शोध लागायचा होता) व अपेक्षेप्रमाणे त्याला फिट आली. अशा ५ ट्रीटमेंट घेतल्यावर त्या रुग्णाची परिस्थिती मेडुना ने लिहून ठेवली आहे. 

“ १० फेब्रुवारी १९३४ (५व्या इंजेक्शननंतर २ दिवसांनी), ४ वर्षात पहिल्यांदाच तो बिछान्यावरुन उठला, व्यवस्थित बोलला, न्याहारी मागवली, कोणत्याही मदतीशिवाय कपडे बददले, सगळ्यांची चौकशी केली. तो ४ वर्षं बिछान्यात पडून होता यावर त्याचा विश्वासच बसला नाही”

या केसनंतर मेडुना ने सुरुवातीला कॅंफर तेल, व नंतर मेट्रोझोल या औषधाच्या मदतीने, अनेक प्रयोग केले. १९३५ साली, त्यानं २६ रुग्णांवर केलेल्या त्याच्या प्रयोगाचे रिझल्टस पब्लिश केले. या २६ पैकी १० (४०%) रुग्णांमध्ये आश्चर्यकारक बदल झाला होता. मेडुना ने केलेलं संशोधन जेव्हा डॉ कार्ल शॅफर या विभाग प्रमुखांसमोर ठेवलं, तेव्हाची त्यांची प्रतिक्रिया मेडुना ने लिहून ठेवली आहे. 

“ त्यांच्या मते मी एक नकली, अप्रामाणिक, अत्यंत नीच व ढोंगी माणूस होतो. मी स्किझोफ्रेनिया, जो एक अनुवांशिक आजार आहे तो बरा करण्याचा दावा करुच कसा शकतो असं त्यांचं मत होतं. त्यांना वाटत होतं, की मी प्रसिद्धी व पैशासाठी हा दावा करतोय. जर मी हा पेपर पब्लिश केला, तर त्यांनी मला पूर्णपणे एकटं पाडण्याची धमकी दिली. शॉक ट्रीटमेंटचा शोध लावल्यापासून हा मला मिळालेला पहिला शॉक होता”. 

सेकल व मेडुना यांच्या संशोधनाने एक गोष्ट सिद्ध झाली, की मेंदूमध्ये फिटसदृश विद्युत बदल होणे, ही घटना मानसिक आजाराच्या लक्षणांवर मात करते. जरी तेव्हाच्या सगळ्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली, तरी त्यांचं संशोधन गेली ८० वर्षं टिकून आहे. त्यांनी वापरलेल्या पद्धती (इन्शुलिन, कॅंफर तेल व मेट्रोझोल) मात्र तितक्या सुरक्षित नव्हत्या, तसेच त्यामुळे होणारे फिटसदृश बदल नियंत्रणात ठेवता येत नव्हते. या औषधांचे स्वत:चे इतर साईड इफेक्ट्स देखील होते. त्यामुळे, असा एक पर्याय हवा होता, की जो सोपा, स्वस्त, सहज उपलब्ध आहे, सुरक्षित आहे, ज्याने हुकमी फिटसदृश बदल मेंदूमध्ये होईल, आणि जो हवा तसा नियंत्रणात ठेवता येईल. 

पुढच्या फक्त ४ वर्षात तो पर्याय मिळाला, इटलीमध्ये. 

क्रमश: 
विद्युतमानसोपचार: दुर्दैवाचा फटका बसलेला एक अत्यंत गुणी व सुरक्षित उपचार: १

  विद्युतमानसोपचार ही आधुनिक मानसोपचारशास्त्रातली पहिली अधिकृत, गुणकारी उपचार पद्धती. १९४० साली इटली मधील युगो सरलेटी व लुशियो बिनी यांनी या पद्धतीचा शोध लावला. सुरुवातीला त्यांना अनेकांनी ‘वेड्यात” काढले, पण पुढे ही पद्धती अत्यंत गुणकारी असल्याचे सिद्ध झाले. १९५० पर्यंत मानसोपचारासाठी कोणतीही औषधे नव्हती. गंभीर मानसिक आजार, जसे स्कीझोफ्रेनिया, बायपोलार आजार, डिमेन्शिया ग्रस्त रुग्णांना गावातील असायलम्स मध्ये डम्प केले जायचे व कोणतेही उपचार नसल्याने ते तिथेच खितपत पडून राहत असत. लोबोटॉमी (मेंदूच्या पुढच्या भाग कापण्याची शस्त्रक्रिया) केल्याने गंभीर मानसिक आजारांवर नियंत्रण तर यायचे, पण मेंदूचा पुढचा भागच माणसाच्या मेंदूला युनिक बनवत असल्याने तो काढून टाकल्यावर राहणार्या शरीरात मनुष्य़त्व रहायचेच नाही. त्यामुळे मानसोपचारासाठी प्रभावी व सुरक्षित उपायांची गरज होती. सरलेटी व बिनी या बिनीच्या शिलेदारांनी ती पूर्ण केली. 

विद्युतोपचार सर्वत्र वापरायला सुरु झाल्यावर त्याचे परिणाम हे आश्चर्यकारक व ज्याला मिरॅक्युलस म्हणता येतील असेच होते व अजूनही आहेत. वर्षानुवर्षं मानसिक आजारांशी झगडणारे रुग्ण पहिल्यांदाच सुधारणेचा मोकळा श्वास घेउ लागले. मानसिक आजारांमध्ये सुधारणा होऊ शकते, हे विद्युतोपचारामुळे सिद्ध झाले. मानसिक आजारांचं मूळ हे मेंदूमध्ये आहे या सिद्धांताला पुष्टी मिळाली. पण, अनेकांनी या उपचारपद्धतीला खोडा घातला. सुरुवातीला तर या उपचार पद्धतीच्या गुणकारीपणावर शंका घेतली गेली. जेव्हा ती फिटली, तेव्हा मानवाधिकारांचा बाऊ केला गेला. पूर्णपणे सुरक्षीत व अत्यंत गुणकारी व अनेक केसेस मध्ये ज्याला रामबाण म्हणता येईल अशी उपचार पद्धती अकारण बदनाम केली गेली. हा कलंक इतका गंभीर आहे, की अनेक मानसोपचारतज्ञ देखील रुग्णांना ही उपचार पद्धती सुचवण्यापूर्वी कचरू लागले! मेंदूचा भाग कापून रुग्ण झॉंबी सारखा होतो हे कळून देखील ती शस्त्रक्रिया शोधणार्याला नोबेल पुरस्कार मिळतो, पण एक अत्यंत सुरक्षित, गुणकारी व मानसिक रुग्णांना पुन्हा माणसात आणणार्या उपचार पद्धतीला अवहेलना सहन करावी लागते हा करंटेपणाच आहे. 

आज, विद्युतधारेचा वापर उपचारासाठी वैद्यकशास्तरातल्या प्रत्येक शास्‌त्रात केला जातो. इसवी सन पूर्व काळात रोमन सम्राटाला मायग्रेनची डोकेदुखी थांबवण्यासाठी इलेक्ट्रिक ईल हा मासा वापरणे हा विद्युतोपचारच होता.  ह्रदय बंद पडल्यावर दिला जाणारा १६० ज्यूल क्षमतेचा डीसी कार्डियोव्हर्जन हा विद्युतोपचारच आहे. त्वचेवरील चामखीळ व वांग हटवन्यासाठी वापरण्यात येणारा, लिव्हर व इतर कॅन्सर च्या गाठी वितळवण्यासाठी वापरला जाणारा रेडिओफ्रीक्वेन्सी अब्लेशन हा विद्युतोपचारच आहे. सर्जरी सुरु असताना रक्तप्रवाह थांबवण्यासाठी वापरण्यात येणारा इलेक्ट्रोकॉटरी हा विद्युतोपचारच आहे. पण या उपायांना मिळालेली प्रतिष्ठा व ग्लॅमर विद्युतमानसोपचाराला कधीच मिळालं नाही, हे दुर्दैव. 

या लेखमालेतून, या उपचारपद्धतीच्या विस्मयकारक प्रवासाचा उलगडा करण्याचा प्रयत्न.