विद्युतमानसोपचार: दुर्दैवाचा फटका बसलेला एक अत्यंत गुणी व सुरक्षित उपचार: १
विद्युतमानसोपचार ही आधुनिक मानसोपचारशास्त्रातली पहिली अधिकृत, गुणकारी उपचार पद्धती. १९४० साली इटली मधील युगो सरलेटी व लुशियो बिनी यांनी या पद्धतीचा शोध लावला. सुरुवातीला त्यांना अनेकांनी ‘वेड्यात” काढले, पण पुढे ही पद्धती अत्यंत गुणकारी असल्याचे सिद्ध झाले. १९५० पर्यंत मानसोपचारासाठी कोणतीही औषधे नव्हती. गंभीर मानसिक आजार, जसे स्कीझोफ्रेनिया, बायपोलार आजार, डिमेन्शिया ग्रस्त रुग्णांना गावातील असायलम्स मध्ये डम्प केले जायचे व कोणतेही उपचार नसल्याने ते तिथेच खितपत पडून राहत असत. लोबोटॉमी (मेंदूच्या पुढच्या भाग कापण्याची शस्त्रक्रिया) केल्याने गंभीर मानसिक आजारांवर नियंत्रण तर यायचे, पण मेंदूचा पुढचा भागच माणसाच्या मेंदूला युनिक बनवत असल्याने तो काढून टाकल्यावर राहणार्या शरीरात मनुष्य़त्व रहायचेच नाही. त्यामुळे मानसोपचारासाठी प्रभावी व सुरक्षित उपायांची गरज होती. सरलेटी व बिनी या बिनीच्या शिलेदारांनी ती पूर्ण केली.
विद्युतोपचार सर्वत्र वापरायला सुरु झाल्यावर त्याचे परिणाम हे आश्चर्यकारक व ज्याला मिरॅक्युलस म्हणता येतील असेच होते व अजूनही आहेत. वर्षानुवर्षं मानसिक आजारांशी झगडणारे रुग्ण पहिल्यांदाच सुधारणेचा मोकळा श्वास घेउ लागले. मानसिक आजारांमध्ये सुधारणा होऊ शकते, हे विद्युतोपचारामुळे सिद्ध झाले. मानसिक आजारांचं मूळ हे मेंदूमध्ये आहे या सिद्धांताला पुष्टी मिळाली. पण, अनेकांनी या उपचारपद्धतीला खोडा घातला. सुरुवातीला तर या उपचार पद्धतीच्या गुणकारीपणावर शंका घेतली गेली. जेव्हा ती फिटली, तेव्हा मानवाधिकारांचा बाऊ केला गेला. पूर्णपणे सुरक्षीत व अत्यंत गुणकारी व अनेक केसेस मध्ये ज्याला रामबाण म्हणता येईल अशी उपचार पद्धती अकारण बदनाम केली गेली. हा कलंक इतका गंभीर आहे, की अनेक मानसोपचारतज्ञ देखील रुग्णांना ही उपचार पद्धती सुचवण्यापूर्वी कचरू लागले! मेंदूचा भाग कापून रुग्ण झॉंबी सारखा होतो हे कळून देखील ती शस्त्रक्रिया शोधणार्याला नोबेल पुरस्कार मिळतो, पण एक अत्यंत सुरक्षित, गुणकारी व मानसिक रुग्णांना पुन्हा माणसात आणणार्या उपचार पद्धतीला अवहेलना सहन करावी लागते हा करंटेपणाच आहे.
आज, विद्युतधारेचा वापर उपचारासाठी वैद्यकशास्तरातल्या प्रत्येक शास्त्रात केला जातो. इसवी सन पूर्व काळात रोमन सम्राटाला मायग्रेनची डोकेदुखी थांबवण्यासाठी इलेक्ट्रिक ईल हा मासा वापरणे हा विद्युतोपचारच होता. ह्रदय बंद पडल्यावर दिला जाणारा १६० ज्यूल क्षमतेचा डीसी कार्डियोव्हर्जन हा विद्युतोपचारच आहे. त्वचेवरील चामखीळ व वांग हटवन्यासाठी वापरण्यात येणारा, लिव्हर व इतर कॅन्सर च्या गाठी वितळवण्यासाठी वापरला जाणारा रेडिओफ्रीक्वेन्सी अब्लेशन हा विद्युतोपचारच आहे. सर्जरी सुरु असताना रक्तप्रवाह थांबवण्यासाठी वापरण्यात येणारा इलेक्ट्रोकॉटरी हा विद्युतोपचारच आहे. पण या उपायांना मिळालेली प्रतिष्ठा व ग्लॅमर विद्युतमानसोपचाराला कधीच मिळालं नाही, हे दुर्दैव.
या लेखमालेतून, या उपचारपद्धतीच्या विस्मयकारक प्रवासाचा उलगडा करण्याचा प्रयत्न.
No comments:
Post a Comment